पिंपरी (Pclive7.com):- “मी या एरियातला भाई आहे.. आत्ताच मोक्यातून जामिनावर आलो आहे” असे सांगून चिकन व्यवसायिकाकडून ५०० रुपयांची खंडणी घेणाऱ्या स्वयंघोषित भाईला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विक्की रामप्रसाद मल (वय ४५, रा. कैलास नगर मोहटादेवी मंदिराजवळ थेरगाव) असे खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक लगड (वय २१, रा. बारणे कॉर्नर थेरगाव) हे चिकन अँड एग्ज विक्रीचा व्यवसाय करतात. एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीत तसेच २५ डिसेंबर २०२५ ते ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील बारामती ऍग्रो चिकन शिवशक्ती नगर, पाण्याच्या टाकीजवळ येथे आरोपीने फिर्यादीकडून पैशांची मागणी केली.

“मी या एरियातील भाई आहे, आत्ताच मोक्यातून जामिनावर आलो आहे,” असे सांगून आरोपीने ५०० रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर धारदार शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली आणि फिर्यादीकडून ५०० रुपये रोख स्वरूपात उकळले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मेटे हे करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group