पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शहरात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी श्रीकर परदेशी किंवा तुकाराम मुंढे यांना आयुक्तपदी नियुक्त करा अशी मागणी भापकर यांनी केली आहे

मारूती भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, २०१७ ते २०२२ या कालावधीत तसेच २०२२ ते २०२६ या प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. विशेषतः विविध कंत्राटे, विकास प्रकल्प, स्मार्ट सिटी उपक्रम, टीडीआर व्यवहार, सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य विभाग, सुरक्षा व स्वच्छता कंत्राटे यामध्ये अनियमितता झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, एका महिला उपायुक्तांच्या केबिनमध्ये घुसून कंत्राटाच्या अटी बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

भापकर यांनी निवेदनात नमूद केले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत पुन्हा बहुमत मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या सुनियोजित आणि दर्जेदार विकासासाठी कठोर व पारदर्शक प्रतिमेचे अधिकारी आयुक्त म्हणून नेमावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी डॉ. श्रीकर परदेशी किंवा तुकाराम मुंढे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.



















Join Our Whatsapp Group