पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी परिसरात चैन स्नॅचिंग करणा-या आरोपींना काळेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल सहा लाख, पाच हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय नरसिंमलू नक्का (वय २९, रा. सोमेश कॉलनी, नांदेड), आदर्श अनिल कामठीकर (वय २५, रा. महावीर चौक, नांदेड) आणि संजू किसन गुडमलवार (वय २४, रा. गुरुद्वारा गेट नंबर दोन जवळ, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सूचनेनुसार चैन स्नॅचिंगच्या तपासाकरिता विशेष पथक तयार केले. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गुरव व पथकाने गुप्त माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जालना जिल्ह्यातील व एका गावातून आरोपींना पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. सुरूवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

आरोपी हे मूळचे नांदेड येथील असून त्यांना जालना येथून अटक करण्यात आली. अटक आरोपींकडून २१.५३० ग्रॅम वजनाचे ३.७९ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच पल्सर व दोन स्प्लेंडर अशा सात मोटारसायकली, दोन मोबाइल हँडसेट व खंजर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी काळेवाडी हद्दीत अनेक चैन स्नॅचिंग व वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group