पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय काळातील कामांवरून जोरदार चर्चा रंगली. शिवसेनाच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी प्रशासकीय काळातील कामांची श्वेतपत्रिका काढा असे सांगत सभागृहाचे लक्ष वेधले. प्रशासकीय काळात झालेल्या कामांबाबत उबाळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सभागृहात बोलताना सुलभा उबाळे यांनी प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली. त्या म्हणाल्या की, त्या काळात अनेक कामे संशयास्पद पद्धतीने आणि घाईगडबडीत करण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी होऊन संपूर्ण माहिती सभागृहासमोर मांडावी.
यावेळी त्यांनी तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली. “आता अधिकाऱ्यांसमोर बजेटबाबत काही मुद्दे मांडले की ‘पैसे नाहीत’ अशी भूमिका घेतली जाते. मग प्रशासकीय काळात निधी कसा उपलब्ध झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, तत्कालीन आयुक्तांना किमान एकदा तरी ‘पाहुणे आयुक्त’ म्हणून सर्वसाधारण सभेत बोलावून त्यांनी केलेल्या कामांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी अनोखी मागणीही उबाळे यांनी केली. उबाळे यांच्या या मागणीमुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले होते. प्रशासकीय काळातील निर्णय आणि कामांबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.



















Join Our Whatsapp Group