पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या आज (दि.२०) झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चांगलाच गाजला. शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा सभागृहात जोरदारपणे उपस्थित करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक कुत्रा आयुक्त आणि महापौरांसमोर भेट स्वरूपात ठेवत प्रशासनाचे लक्ष वेधले. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेक तक्रारी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच शाळेच्या बसमधून उतरत असताना मुलांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत, “शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच हा मुद्दा आज सभागृहात मांडला,” असे राजू मिसाळ यांनी स्पष्ट केले.
सभागृहात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठ महिन्यांत सुमारे २० हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीही चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

गेल्या १० वर्षांतील कुत्रा चावण्याच्या घटनांची आकडेवारी :
2016-17 : 10,533
2017-18 : 13,558
2018-19 : 14,842
2019-20 : 12,751
2020-21 : 13,832
2021-22 : 13,892
2022-23 : 18,500
2023-24 : 24,169
2024-25 (ऑक्टोबरपर्यंत) : 28,099
दरवर्षी वाढत जाणारी ही संख्या प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. कुत्र्यांच्या निर्बंध आणि नियंत्रणासाठी ठोस धोरण आखावे, तसेच तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. या मुद्द्यावर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढील काळात काय निर्णय होतात, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Tags: Raju Misal



















Join Our Whatsapp Group