पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी चौक परिसरात मंगळवारी (दि.२४) सकाळी ‘ग्रेट सेपरेटर’मध्ये एक कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, उंची मर्यादेपेक्षा जास्त असलेला कंटेनर ग्रेड सेपरेटरखाली जात असताना अडकला. त्यामुळे मोरवाडी चौकातून नाशिक फाटा तसेच चिंचवड गावकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि परिसरात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली; मात्र कोंडी पूर्णपणे सुटण्यास सुमारे एक ते दीड तास लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेमुळे ‘ग्रेट सेपरेटर’खालील उंची मर्यादा आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित विभागाने उंचीबाबत स्पष्ट सूचना फलक लावावेत तसेच सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अवजड वाहनांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group