पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी परिसरातील विजयनगर येथे फर्निचरच्या कामावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एस.पी. फर्निचरजवळ ही घटना घडली. फिर्यादी बजरंगलाल श्रीनिवास बंग (वय ३५, या. रहाटणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मित्राचे फर्निचरचे काम पूर्ण का केले नाही, याचा जाब विचारण्यासाठी ते गेले असता आरोपी सलीम मुसा पंजेशा (वय ४४, रा. कृष्णा कॉलनी, नढेनगर) याने त्यांच्यावर हल्ला केला.

वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या नाकावर जोरात बुक्का मारल्याने त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुरव हे करत आहेत.



















Join Our Whatsapp Group