पिंपरी (Pclive7.com):- भोसरी परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या वतीने भोसरी पोलिस स्टेशनला २० सीसीटीव्ही कॅमेरे भेट स्वरूपात देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भोसरी परिसरात दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ मुख्य निरीक्षक संदीप घोरपडे यांनी परिसरातील सर्व प्रभागांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर रवी लांडगे यांनी स्वखर्चातून भोसरी परिसरातील पुणे-नाशिक हायवे येथे २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे वाहनचोरीस प्रतिबंध होण्यास मदत होणार असून पोलिस प्रशासनालाही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहकार्य मिळणार आहे.

यावेळी महापौर रवी लांडगे यांनी सर्व नगरसेवकांना नम्र आवाहन करत आपल्या-आपल्या प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज अधोरेखित केली. “कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे भोसरी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



















Join Our Whatsapp Group