पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत चिखलीचे भाजपाचे नगरसेवक राहुल जाधव विजयी झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना विनंती देखील केली होती. मात्र निवडणुक झाल्यामुळे चिखलीतला महापौर करण्यास चिखलीतूनच विरोध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने हे दोघेही चिखलीचे आहेत. पालिकेत भाजपाचे बहुमत आहे. ७७ नगरसेवक भाजपाचे आहेत. ३६ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. तर ७ अपक्षांनी भाजपाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे महापौर निवडणूकीत भाजपाच्या राहुल जाधव यांचा विजय निश्चित होता. दरम्यान सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि राहुल जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना निवडणुक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पराभव होणार असून राष्ट्रवादीने माघार न घेतल्याने निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागली.
या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाचा विजय झाला. राहुल जाधव यांना ८० मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना ३३ नगरसेवकांनी मतदान केले. बिनविरोध होत असतानाही दत्ता साने यांनी ही निवडणूक घेतली. त्यामुळे चिखलीतला महापौर करण्यासाठी चिखलीतूनच विरोध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.





















Join Our Whatsapp Group