पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राहुल जाधव यांना मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी मतदान केले. जाधव हे खरे मनसैनिक आहेत. ते गेल्या टर्ममध्ये मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्याबद्दल आजही ते राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानायला विसरले नाहीत. म्हणूनच खऱ्या मनसैनिकाच्या पाठीशी मी उभा राहिलो. मतदान देखील दिले असल्याचे मत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी व्यक्त केले.
चिखले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक पदी २०१२ ते २०१७ या दरम्यान होते. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे तीन नगरसेवक व मनसेचे चार नगरसेवक असे मिळून ७ नगरसेवकांचा एक गट तयार होत होता. त्यावेळेस माझ्यामुळे हा गट तयार झाला नाही व राहुल जाधव यांचे स्थायी समितीचे सदस्य होण्याचे स्वप्न भंगले गेले होते. त्याचे ऋण मी आज फेडले आहे.
दरम्यान काल सर्व प्रसारमाध्यमांच्या समोर राहुल जाधव हे सांगायला विसरले नाहीत की, माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणतीही जातपात न पाहता पहिल्यांदाच मनसेचे तिकीट दिले होते. त्यामुळेच मी सर्वसामन्य मनसैनिकाचा चिखली या प्रभागातून नगरसेवक होऊ शकलो व आज महापौर होत आहे. असे बोलून त्यांनी राजसाहेबांचे आभार देखील त्यांनी मानले. महापौर हा कोणत्याही पक्षाचा नसून तो नागरिकांचा असतो. राहुल जाधव हे माझ्या राजसाहेबांना विसरू शकला नाही. त्यामुळे मनसेच एकमेव मतदान राहुल जाधव यांना मी केलेले आहे. तर उपमहापौर निवडणूकीत मनसे तटस्थ राहिली होती.