पिंपरी (Pclive7.com):- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील लघुउद्योगांवरही दिसू लागला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील हजारो उद्योग अडचणीत सापडले आहेत. शहरातील सुमारे १५ हजार लघुउद्योगांपैकी साडे सात हजार कंपन्यांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कंपन्यांमधील गॅसचा साठा संपत आला असून काही उद्योगांमध्ये तर गॅसचा साठा आजच संपुष्टात आला आहे. उर्वरित कंपन्यांमध्ये असलेला साठा पुढील चार ते पाच दिवसांत संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत असून अनेक उद्योगांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत.
भोसरीतील श्री इंजिनिअर्स या कंपनीत व्यावसायिक गॅस संपल्याने प्लाझ्मा मशीनचा पर्याय वापरावा लागत आहे. मात्र या पर्यायामुळे उत्पादन थेट निम्म्यावर आले आहे. कंपनीचे लघुउद्योजक नितीन बेलसरे यांनी सांगितले की, “आमच्या कंपनीची महिन्याला सुमारे ४० लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत उत्पादन घटल्याने महिन्याला सुमारे २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.”
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील साडे सात हजार कंपन्यांमधील गॅसचा साठा पूर्णपणे संपल्यानंतर उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लघुउद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






















Join Our Whatsapp Group