पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या लग्नसराईवर युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील सुमारे ४५० केटरर्सकडून लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे सुमारे १० हजार लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत शहरात लग्नाचे सुमारे ३० मुहूर्त आहेत. साधारणपणे एका मुहूर्तावर ४०० ते ५०० लग्न सोहळे पार पडतात. त्यानुसार या दोन महिन्यांत १० ते १२ हजार लग्न सोहळे होण्याची शक्यता आहे. मात्र युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून केटरर्सना गॅस मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या परिस्थितीमुळे अनेक केटरर्सनी घेतलेल्या लग्नसमारंभांच्या जेवणाच्या ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही केटरर्स अधिक दराने गॅस मिळाल्यास प्रती थाळी १० ते २० टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत असल्याचेही समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे यांनी सांगितले की, शहरातील ४५० केटरर्सकडे मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभांच्या जेवणाच्या ऑर्डर आहेत. मात्र गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास अनेक लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते. दरम्यान, या परिस्थितीचा परिणाम केवळ लग्नसमारंभांवरच नव्हे तर केटरिंग व्यवसायावरही होणार आहे. शहरातील केटरर्सकडे काम करणाऱ्या सुमारे ४५ हजार कामगारांच्या रोजगारावरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group