पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याला (डीपी प्लॅन) आरपीआयचे नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत डीपी प्लॅन तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

नगरसेवक कुणाल वाव्हळकर म्हणाले की, प्रारूप विकास आराखड्यात सर्वे क्रमांक १७६, १७७ आणि १७८ या ठिकाणी असलेल्या गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवरून डीपी प्लॅन आखण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांचे घरे धोक्यात येणार असून अनेक कुटुंबे बेघर होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात बोलताना त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. “हा डीपी प्लॅन तारांकित हॉटेलमध्ये बसून बनवलेला आहे. आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही. प्रशासनाने पूर्णपणे मनमानी कारभार केला आहे,” असे वाव्हळकर यांनी सभागृहात सांगितले.
या आराखड्यामुळे सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर येण्याची वेळ येईल, त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून हा डीपी प्लॅन तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. दरम्यान, या मुद्द्यावर सभागृहात काही काळ चर्चा झाली प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags: Kunal Wavhalkar























Join Our Whatsapp Group