पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात दूषित पाणी पिल्यामुळे २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील दूषित पाणी पिल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले असून ८ ते १० विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही वसतिगृहातील वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेरचे पाणी पिण्याची वेळ आली, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत स्वच्छ पाण्याची मागणी केली होती.
इतकी गंभीर घटना घडूनही आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्या मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अनिल तिटकारे यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.



















Join Our Whatsapp Group