पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात तात्काळ रद्द करून नागरिकांना पूर्ववत आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, सध्या झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असून पाणीटंचाईची परिस्थिती निवळली आहे.

तरी देखील शहरात पाणीकपात कायम ठेवण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणे आणि दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे उबाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

धरणातील पाणीस्थिती सुधारली असताना पाणीकपात सुरू ठेवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत त्यांनी महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणीकपात रद्द करावी व पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही सुलभा उबाळे यांनी व्यक्त केली आहे.



















Join Our Whatsapp Group