पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कु. कियांश शर्मा याने संस्कृत श्लोक पठणाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव नोंदवले आहे. या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

कियांश हा श्री. प्रज्ञेश शर्मा आणि सौ. रेना शर्मा यांचा सुपुत्र असून लहान वयातच त्याने भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा आणि अध्यात्मिक मूल्यांचा वारसा जपत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संस्कृत श्लोकांचे अचूक पठण, शुद्ध उच्चार आणि उत्कृष्ट पाठांतराच्या जोरावर त्याने जागतिक विक्रमात सहभाग नोंदवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त केले.

२ फेब्रुवारी २०२६ रोजी वडोदरा येथे आयोजित ‘सत्संग दीक्षा फिनाले’ कार्यक्रमादरम्यान भव्य संस्कृत श्लोक पठण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात कियांशने उल्लेखनीय सहभाग नोंदवत जागतिक विक्रमाचा भाग बनण्याचा मान मिळवला. त्यानंतर ८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष सत्कार समारंभात पूज्य कोठारी स्वामी (कोठारी बापा) यांच्या हस्ते कियांशला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या यशाबद्दल भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी कियांशचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “आजच्या आधुनिक युगात एवढ्या लहान वयात संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपत जागतिक स्तरावर यश मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. कियांशचे हे यश केवळ त्याच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण पिंपळे सौदागर आणि पिंपरी-चिंचवड शहराचा गौरव आहे. त्याची ही कामगिरी इतर बालकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

कियांश शर्माच्या या उल्लेखनीय यशामुळे पिंपळे सौदागर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून त्याच्यावर आणि शर्मा कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






















Join Our Whatsapp Group