पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील ४५ मीटर रुंदीच्या दत्त मंदिर रोडवर मोठ्या प्रमाणावर देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून पिंपरी-चिंचवड शहरातील एक आदर्श ‘रोल मॉडेल हरित मार्ग’ विकसित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि झपाट्याने होत असलेले नागरीकरण यामुळे वाढणारे प्रदूषण लक्षात घेता नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी दत्त मंदिर रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित न ठेवता सुयोग्य हरित रचना, सावली देणारी वृक्षसंरचना, पर्यावरणपूरक सुशोभीकरण, नियमित देखभाल आणि योग्य संगोपन यांच्या माध्यमातून विकसित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध जागेचे सर्वेक्षण करून वड, पिंपळ, कडुनिंब, करंज, अर्जुन, जांभूळ, बहावा, कांचन, चिंच आणि आवळा यांसारख्या स्थानिक हवामानाला पूरक देशी वृक्षांची लागवड करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.

तसेच वृक्षांच्या संगोपनासाठी नियमित पाणीपुरवठा, खत व्यवस्थापन, छाटणी, वृक्षसंरक्षक जाळी आणि देखभालीची प्रभावी यंत्रणा उभारावी. शक्य असल्यास ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पादचारी मार्गालगत सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली आहे.

“दत्त मंदिर रोड हा केवळ वाहतुकीचा मार्ग न राहता पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणपूरक विकासाचे प्रतीक ठरावा. भविष्यात शहरातील इतर प्रमुख रस्त्यांसाठीही हा हरित मार्ग आदर्श मॉडेल म्हणून उपयोगी पडेल,” अशी अपेक्षा नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी व्यक्त केली. दरम्यान, संबंधित रस्त्याची तातडीने पाहणी करून उपलब्ध जागेचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित मार्ग विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group