पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड दरम्यान सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केले जात आहे. किवळे येथे ठेकेदाराने रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड बायपासपासून किवळे, रावेत मार्गे वाकडपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचे काम डीएमआर इन्फ्रा या ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने प्राप्त होत असलेल्या तक्रारीनुसार सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः किवळे जंक्शन येथे दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या अंडरपासचे कामदेखील गुणवत्तापूर्ण झालेले नाही. रस्ते बांधकामासाठी आवश्यक मानकांचे पालन न केल्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (पावसाच्या पाण्याचा निचरा) व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आलेली नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे. तसेच सर्व्हिस रोडची स्थितीही अत्यंत खराब आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.

या मार्गावर सुमारे ८.२५ किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड रोडचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेची निष्पक्ष व तांत्रिक तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे,.जेणेकरून भविष्यातील प्रस्तावित कामदेखील निर्धारित मानकांनुसार होईल. हा रस्ता व अंडरपासच्या बांधकामाच्या कामाची उच्चस्तरीय गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. तसेच रस्ता, अंडरपास, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आणि सर्व्हिस रोडचे पुनर्बांधकाम निर्धारित गुणवत्तेच्या मानकांनुसार करून घेण्यात यावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

ठेकेदाराला बडतर्फ करण्याचा इशारा
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. कामाचा दर्जा सुधारावा. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. कामात सुधारणा न झाल्यास काम काढून घेण्याचा आणि ठेकेदाराला टर्मिनट करण्याचा इशारा गडकरी यांनी दिला.






















Join Our Whatsapp Group