पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर समस्येवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नाना काटे यांनी म्हटले आहे की, शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिक, महिला आणि लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलीकडेच चिखली परिसरात एका लहान मुलीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. तसेच रावेत येथील सिटी प्राईड शाळेजवळ एका महिला व मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करून त्यांना खाली पाडण्याचा आणि कपड्यांना तोंडाने ओढण्याचा प्रयत्न भटक्या कुत्र्यांनी केल्याची घटना घडली. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील शाळा, उद्याने, सोसायट्या, बाजारपेठा आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या परिसरांमध्ये भटक्या कुत्र्यांची टोळकी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून निर्बीजीकरण (ABC) आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे. तसेच नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक कुत्र्यांबाबत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय शाळा, महाविद्यालये, उद्याने आणि संवेदनशील परिसरांमध्ये विशेष पथके नियुक्त करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी हेल्पलाइन आणि तातडीची प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. नागरिकांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची जबाबदारी महानगरपालिकेची असून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, असे नाना काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.






















Join Our Whatsapp Group