पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-वाघेरे येथील म्हाडा टॉवर्समधील ११ टॉवर्समधील सुमारे ९३५ फ्लॅट आणि ४,६७५ नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असताना, वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रश्नावर ठोस कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज सुमारे ९० लिटर पाणी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र म्हाडा टॉवर्समध्ये नागरिकांना प्रत्यक्षात सरासरी केवळ ३५ लिटर पाणी प्रति व्यक्ती मिळत आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाला दररोज तब्बल ५५ लिटर पाण्याची कमतरता भासत आहे.

म्हाडा टॉवर्समधील एका टॉवरमध्ये ८५ फ्लॅट असून, सरासरी ५ सदस्य गृहीत धरल्यास एका टॉवरमध्ये सुमारे ४२५ नागरिक आहेत. त्यानुसार एका टॉवरला दररोज सुमारे ३८,५०० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. दोन दिवसांसाठी ही गरज ७७,००० लिटर होते.

११ टॉवर्ससाठी दोन दिवसांची एकूण गरज तब्बल ८,४१,५०० लिटर इतकी आहे. मात्र उपलब्ध पाण्याच्या आकडेवारीचा विचार करता, प्रत्यक्ष पुरवठा आवश्यकतेपेक्षा मोठ्या प्रमाणात कमी आहे. परिणामी हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता आणि दैनंदिन वापरासाठी पाण्याचे नियोजन करावे लागत आहे.

चुकीच्या आकडेवारीने प्रश्न सुटणार नाही; नागरिकांना पाणी हवे आहे..
पाणीपुरवठ्याबाबत वेगवेगळी टक्केवारी व आकडेवारी सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना रहिवाशांमध्ये आहे. “टक्केवारी कोणत्या आधारावर काढली जाते, हे आम्हाला समजत नाही; आम्हाला कोणतीही टक्केवारी नको, आम्हाला फक्त दररोज प्रति व्यक्ती ९० लिटर पाणी हवे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली.
गेल्या एक महिन्यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊनही अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. वारंवार पत्रे, निवेदने आणि पाठपुरावा करूनही जर नागरिकांच्या मूलभूत पाणी प्रश्नावर प्रशासन कारवाई करत नसेल, तर हा प्रश्न आता अधिक तीव्र स्वरूपात उपस्थित करावा लागणार आहे.

आता आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार..
महापालिका प्रशासन आणि म्हाडाकडून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात न आल्यास, पुढील निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात येईल आणि त्याची प्रत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल, असा इशारा म्हाडा टॉवर्स फेडरेशनने दिला आहे.
रहिवाशांची मागणी स्पष्ट आहे..
१. प्रत्येक नागरिकाला दररोज आवश्यक ९० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे.
२. पाणीपुरवठ्यातील तूट तातडीने दूर करावी.
३. परिसरातील सर्व अनधिकृत पाणी कनेक्शनची निष्पक्ष तपासणी करून कारवाई करावी.
४. पाणीपुरवठ्याची अचूक आकडेवारी सार्वजनिक करावी.
५. पाणीपुरवठ्याबाबत जबाबदार अधिकारी व संबंधित यंत्रणांनी ठोस कृती आराखडा जाहीर करावा.
६. हजारो नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित या प्रश्नावर केवळ आश्वासने न देता तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करावी.
दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची वाट प्रशासनाने पाहू नये. पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे; तो कोणत्याही टक्केवारी, कागदी अहवाल किंवा आश्वासनाने सुटणार नाही. म्हाडा टॉवर्सच्या हजारो रहिवाशांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत फेडरेशनचा पाठपुरावा सुरूच राहील.– योगेश आव्हाड,अध्यक्ष,डॉ. विजय देशमुख, सचिव म्हाडा टॉवर्स फेडेरेशन, पिंपरी वाघेरे, पुणे -४११०१७






















Join Our Whatsapp Group