पिंपरी (Pclive7.com):- पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गेच व्हावी, त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी नवीन रेल्वे कॉरिडॉर व्हावा व चाकण विमानतळाच्या जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल व्हावे अशा मागण्यांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते. त्यापाठोपाठ त्यांनी आज रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गेच व्हावी यासाठी झालेल्या जनआंदोलनाची माहिती देत अनेक ठिकाणी प्रकल्पांना विरोध होत असताना हा प्रकल्प व्हावा यासाठी आंदोलन होत असल्याकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधून जुन्या मार्गानेच रेल्वेमार्ग व्हावा अशी आग्रही मागणी केली. यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीच्या अहवालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर खासदार डॉ. कोल्हे यांनी चाकण विमानतळाच्या जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल व्हावे आणि मालवाहतुकीसाठी समर्पित (Dadicated freight Corridor) न्हावाशेवा बंदराला जोडणारा उरण, तळेगाव, चाकण, संभाजीनगर असा नवीन रेल्वे कॉरिडॉर व्हावा अशी मागणीही केली.

उरण, तळेगाव, चाकण, संभाजीनगर असा मालवाहतुकीसाठी समर्पित (Dadicated freight Corridor) नवीन रेल्वेमार्ग उभारल्यास तळेगाव, चाकण, रांजणगाव, संभाजीनगरसह विविध एमआयडीसीतील कंपन्यांना कच्चामाल व उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होऊ शकेल. सध्या संपूर्ण मालवाहतूक पूर्णपणे रस्ते वाहतुकीवर अवलंबून असून वाहतूक कोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत असल्याने कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे Dadicated freight Corridor अत्यंत गरजेचा असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव निदर्शनास आणले. तसेच या मार्गावर चाकण विमानतळाच्या जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल बांधल्यास चांगली सुविधा निर्माण होऊन औद्योगिक वाढीला चालना मिळेल असे सांगितले.

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन खासदार डॉ. कोल्हे यांना दिले. तसेच डॉ. काकोडकर समितीचा अहवाल सकारात्मक यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

“चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागी पीएम गती शक्ती टर्मिनल उभारण्यात यावे. औद्योगिक तसेच शेतीमालाच्या वाहतुकीसाठी स्वस्त व जलद पर्याय मिळेल. तसेच सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटेल.”






















Join Our Whatsapp Group