पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या अवघ्या चार महिन्यांत तब्बल १३ हजार ६१५ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः लहान मुलांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हेत्रेवस्ती येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत ५ वर्षांच्या चिमुकलीवर ५ ते ७ कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर आता वाल्हेकरवाडीतील चिंचवडे नगर परिसरात एका लहान मुलावर कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुदैवाने स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने मुलाचा जीव वाचला.

शहरात सध्या ९० हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या अन्नकचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या अंगावर कुत्रे धावून जात असल्याने अपघातांच्या घटनाही वाढत आहेत.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या कालावधीत अनुक्रमे ३७३, २९२, ३१५ आणि १५७ श्वान संतती नियमन (ABC) शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच १९९८, २५५२, २९१६ आणि २३४७ भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, या उपाययोजनांनंतरही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, अलीकडील घटनांनंतर महापालिका प्रशासनाने चार विशेष पथके तैनात करून संबंधित कुत्र्यांना पकडल्याचा दावा केला आहे. मात्र, डॉग शेल्टर, निर्बीजीकरण आणि भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाबाबत ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

शहरातील नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक, रस्त्यावर सुरक्षितपणे वावरू शकतील अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी महापालिकेने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे आता “नागरिक सुरक्षित कधी होणार?” हा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांकडून थेट प्रशासनाला विचारला जात आहे.






















Join Our Whatsapp Group