पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्राधिकरणातील अप्पूघर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, वृक्षतोडीस परवानगी नेमकी कोणी दिली? नियमांचे पालन झाले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अप्पूघर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कापली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात एकीकडे पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे हिरवीगार झाडे तोडली जात असतील तर महापालिका प्रशासन नेमके काय करत आहे? या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केली आहे.

वृक्षतोडीच्या ठिकाणी महापालिका प्रशासन आणि पर्यावरण व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करावी. संबंधित झाडे तोडण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का? परवानगीतील अटींचे पालन झाले आहे का? याची सखोल तपासणी करावी. परवानगी नसताना वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि तत्काळ वृक्षतोड थांबवावी, अशी भूमिका कुटे यांनी घेतली आहे.
शहराच्या वाढत्या काँक्रिटीकरणामुळे आधीच पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना शहरात नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेल्या दुर्गा टेकडी परिसरातील अप्पू घर येथील असलेली झाडेही अशा प्रकारे तोडली जात असतील तर भविष्यात नागरिकांना त्याची मोठी पर्यावरणीय किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल सहन केली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका प्रमोद कुटे यांनी मांडली आहे.

















Join Our Whatsapp Group