पिंपरी (Pclive7.com):- महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, बेसिक्स टीम आणि बाबुरावजी घोलप विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, बाबुरावजी घोलप विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, आरोग्य मुकादम अरुण जगताप, महापालिकेचे कर्मचारी, बेसिक्स टीमचे सदस्य तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्लॉगाथॉनमध्ये सहभागी होत विद्यालय परिसर आणि परिसरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान सुमारे १५८ किलो कचरा आणि प्लास्टिक संकलित करण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

















Join Our Whatsapp Group