आळंदी (Pclive7.com):- दिवेआगार येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आज (दि.२ ऑक्टोबर) आळंदी आणि केळगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

आळंदी देवाचीचे नगराध्यक्ष प्रशांत पोपटराव कुऱ्हाडे तसेच समस्त आळंदी व केळगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व व्यापारी, व्यावसायिक, संस्था, संघटना आणि नागरिकांना या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ परिसरातील नागरिकांनी एकजूट दाखवत शोक व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक व्यापारी आणि व्यावसायिकांनीही बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालये, औषध दुकाने, रुग्णवाहिका सेवा तसेच इतर अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
दिवेआगार दुर्घटनेमुळे आळंदी आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत असून, मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध ठिकाणी प्रार्थना सभा आणि श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

















Join Our Whatsapp Group