आळंदी (Pclive7.com):- दिवेआगार येथे सहलीदरम्यान झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आळंदी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील कोचिंग क्लासेस व शैक्षणिक आस्थापनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विनर्स अकादमीवर कारवाई करत संबंधित मिळकत सील करण्यात आली.

नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली असता, श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729 या ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान या आस्थापनेकडे नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना अथवा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर लागू कायदे व नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची मिळकत सील केली.

या कारवाईदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित शैक्षणिक आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊन नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेच्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दिवेआगार दुर्घटनेनंतर शहरातील विविध शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस व अन्य आस्थापनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


















Join Our Whatsapp Group