पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.२ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘लोकशाही बचाव सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे.

देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये आणि मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार यादीतील बदल तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे शहर काँग्रेसकडून सांगण्यात आले.
या सप्ताहांतर्गत समविचारी पक्षांसोबत जिल्हास्तरीय बैठका, ब्लॉकस्तरीय बैठका, पत्रकार परिषद, ‘वोट बचाव–देश बचाव’ मार्च, पदयात्रा तसेच जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांच्या माध्यमातून जनतेला एकत्रित करून स्वातंत्र्याच्या लढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप दिले. ‘भारत छोडो’ आंदोलनाने स्वातंत्र्यलढ्यात जनशक्तीची ताकद अधोरेखित केली. त्याच लोकशाहीवादी आणि संविधानिक मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून आजच्या काळात मतदारांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याचा निर्धार या सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

“वोट चोरो – कुर्सी छोडो” या जनघोषणेसह मतदारांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
याबाबत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले की, “महात्मा गांधी जयंती हा केवळ स्मरणाचा दिवस नसून सत्य, अहिंसा, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या अधिकारांबाबत संवाद साधणे हा ‘लोकशाही बचाव सप्ताहा’चा प्रमुख उद्देश आहे.”
या सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समविचारी पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

















Join Our Whatsapp Group