पिंपरी (Pclive7.com):- दुचाकी चोरायच्या, त्यांचे सुटे भाग वेगळे करायचे आणि ते भंगारात विकून पैसे कमवायचे, असा उद्योग करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून पाच दुचाकी आणि वाहनांचे सुटे भाग असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पवन मरीआप्पा भज्जी (वय २५, रा. औंध, पुणे) आणि ऋषीकेश शहाजी साठे (वय २९, रा. पिंपळे निलख) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील रोहन लेअर सोसायटीमधून यामाहा एमटी १५ दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरातील तब्बल ९० ते १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून चोरटे पिंपळे निलख येथील इंगवले चौकाच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ऋषीकेश साठे याच्या पिंपळे निलख येथील फॅब्रिकेशनच्या दुकानाची झडती घेतली. तेथे चोरीच्या दुचाकींचे पार्टस वेगळे करून ते भंगारात विकण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी कारवाई करत पाच दुचाकी आणि मोठ्या प्रमाणात सुटे भाग जप्त केले. आरोपींवर यापूर्वीही वाकड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अप्पर आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, स्वप्निल साबळे, अक्षय लाटे, फारुक मुल्ला आदींच्या पथकाने ही कारवाई केली.



















Join Our Whatsapp Group