पिंपरी (Pclive7.com):- रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवत रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत टोळीचा दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय चिंतामन देसले पाटील (वय २९) हे २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरील एमएआरजे टेक्ने प्लास्ट कंपनीसमोर असताना अनोळखी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून त्यांना अडवले. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या पँट व शर्टच्या खिशातील ११ हजार ४७० रुपये जबरदस्तीने लुटून नेले. या घटनेनंतर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. कोणताही ठोस सुगावा नसताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित रिक्षाचा क्रमांक शोधून काढला. त्याआधारे आरोपी अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख (वय २६) आणि शेखर बापू माने (वय २१) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच या गुन्ह्यातील एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.

तपासात धक्कादायक बाब समोर आली असून मुख्य आरोपी अमन ऊर्फ शाहबाज शेख हा निगडी पोलीस ठाण्यातील मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातून केवळ १५ दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसरा आरोपी शेखर माने याच्यावरही जबरी चोरी व मारहाणीचे गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवड, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, पोलीस हवालदार चेतन सावंत, पोलीस शिपाई राजेंद्र खेडकर, प्रविण बांबळे, शिवाजी मरकड, राजेश गिरी, आकाश घाडगे, व राजकुमार हणमंते यांनी केली आहे. तसेच दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी हे करत आहेत.



















Join Our Whatsapp Group