पिंपरी (Pclive7.com):- ज्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ लिहीले गेले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरजच नाही, ती भाषा मुळातच अभिजात आहे. या अभिजात मराठीतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला जेव्हा असे काव्य सापडत गेले, तेव्हा त्याला चाली देत गेलो. माझ्या बालपणापासूनच आईकडून ऐकलेल्या गोष्टी आणि नंतर तिने वाचून दाखवलेल्या पुस्तकांमधून भाषेचे सौंदर्य माझ्या मनावर संस्कार करत गेले. माझी मोठी बहीण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हिच्या आशीर्वादाचा माझ्या संगीतसाधनेत मोठा वाटा आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने केलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या सन्मानाबद्दल मी महानगरपालिकेचा मनःपूर्वक आभारी आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी सन्मान दिन तसेच अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
याप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिनिधी तुषार झरेकर, किशोर बरकुले तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली, ज्या मराठीध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याची गरजच नाही. ती भाषा मुळातच अभिजात आहे. या अभिजात मराठी भाषेतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला जेव्हा अभिजात काव्य सापडत गेले, तेव्हा त्या काव्याला चाली देत गेलो. कविता मला अंतर्मुख करते. माझ्या बालपणी आई मला गावाकडच्या अनेक गोष्टी सांगायची. त्यानंतर आईने मला पुस्तके वाचून दाखवण्याचे ठरवले. माझ्या हातात आलेले पहिले पुस्तक हे एक नाटक होते आणि त्या नाटकाचे लेखक होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्या काळात कानावर पडणाऱ्या भाषेच्या सौंदर्याने मनावर खोल संस्कार झाले. शब्द, भाषा आणि स्वर यांचे नाते तेव्हापासूनच मनात रुजत गेले.
स्वरांची माऊली आहे, शब्दांची माऊली आहे आणि भाषेचीही एक माऊली आहे. ज्ञानेश्वरांना लोक ‘माऊली’ म्हणू लागले, कारण ते ज्या भाषेला टेकून बसले होते, त्या भाषेनेच असंख्य लोकांना ज्ञान आणि भावविश्व दिले. त्या भाषेचे वैभव अनुभवताना तिच्याप्रती असलेली कृतज्ञता अधिक दृढ होते. माझी मोठी बहीण लता मंगेशकर यांनी अभिजात संगीत निर्माण केले. त्यांच्या आशीर्वादाने आणि संस्कारांनी माझ्या संगीतसाधनेतून जे काही निर्माण झाले, त्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती. मंगेशकर कुटुंबातून मिळालेला हा सांगीतिक वारसा माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने माझा जो सन्मान केला, त्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मनःपूर्वक आभारी आहे. हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा आहे.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महान कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लाभले, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. मुळात आपल्या उपस्थितीमुळेच या सोहळ्याची उंची खूप मोठी झाली आहे. आपल्या कर्तृत्वाची आणि संगीतसाधनेची व्याप्ती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्या शब्दांना एक किनारा आहे पण आपल्या शब्दांना आणि आपल्या संगीताला कोणताही किनारा नाही. आपण स्वतः एक अथांग समुद्र आहात.
आपल्या व्यक्तिमत्त्वाची आभा अतिशय निर्मळ आणि प्रसन्न आहे. आपल्या सहवासात येताना एक वेगळाच आनंद आणि समाधान अनुभवायला मिळते. आपले मार्गदर्शन, आपला सहवास आणि आपल्या कलेचा हा समृद्ध वारसा आम्हाला आणि पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा. आपण यापुढील आयुष्य आरोग्यसंपन्न, आनंदी आणि दीर्घायुषी जावो, आपल्या हातून आणखी उत्तमोत्तम कलानिर्मिती घडत राहो आणि आपले आणखी काम आम्हाला पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळो, ही मनःपूर्वक सदिच्छा, असेही अतिरिक्त आयुक्त बगाडे यावेळी म्हणाले.

प्रास्ताविकात बोलताना विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या अभिजातत्वाचा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या व्यवहारात आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या संस्कारांमध्ये दिसला पाहिजे. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
या विशेष दिवसाच्या निमित्ताने आज आपण ज्यांचा सन्मान करीत आहोत ते मराठी संगीतविश्वातील एक विलक्षण प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहे. संगीतसूर्य मास्टर दीनानाथजी मंगेशकर यांच्या संगीतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या मंगेशकर कुटुंबाने भारतीय संगीतविश्वाला अनेक अनमोल स्वर दिले. त्या महान परंपरेतून आलेल्या पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांनी मात्र आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, प्रयोगशील संगीतदृष्टीने आणि सखोल संगीतसाधनेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक आहे, लोकसंगीताची मातीशी जोडलेली सहजता आहे, पाश्चात्त्य संगीताची प्रयोगशीलता आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठी शब्दांविषयीची विलक्षण संवेदनशीलता आहे. आज अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचेही विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होत आहे आणि ते आज आपल्यासमवेत उपस्थित आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत भाग्याची आणि आनंदाची बाब आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, वृत्त छायाचित्रकार या पत्रकारितेतील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेकदा एखाद्या वृत्त छायाचित्रकाराने टिपलेले एक छायाचित्र संपूर्ण बातमी सांगून जाते. त्या एका छायाचित्रातून घटनेचा संदर्भ, गांभीर्य आणि वास्तव वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. वृत्त छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेल्या अशाच विविध घटनांचे आणि प्रसंगांचे हे छायाचित्र प्रदर्शन ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून माध्यम प्रतिनिधींच्या नजरेतून समाजातील विविध पैलू अनुभवता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन छायाचित्रांच्या माध्यमातून मांडलेले वास्तव आणि पत्रकारितेतील या महत्त्वाच्या योगदानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मानले. तसेच मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.


















Join Our Whatsapp Group