पिंपरी (Pclive7.com):- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) शिरवळ येथे मंगळवारी पहाटे भीषण अपघात होऊन मावळातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.11 ऑगस्ट 2026) पहाटे सुमारे 1.10 वाजण्याच्या सुमारास सातारा-पुणे लेनवर शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा येथील हॉटेल शिवालयसमोर हा अपघात घडला. टाटा नेक्सॉन (MH 14 LJ 3033) ही कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार प्रथम डिव्हायडरला धडकून पलटी झाली आणि विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आयशर ट्रक (KA 27 C 5878) ला जोरदार धडकली.

या भीषण अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे (वय 19, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (वय 19, रा. कामशेत, ता. मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (वय 19, रा. टाकवे, ता. मावळ) आणि निखिल बाळू राऊत (वय 20, रा. कामशेत, ता. मावळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी (वय 20, रा. कामशेत, ता. मावळ) आणि मयूर हनुमंत शिंदे (वय 20, रा. बहुर, कामशेत, ता. मावळ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची पुढील कायदेशीर कार्यवाही शिरवळ पोलीस ठाण्याकडून सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group