पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षीय चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यातील दृश्यांनी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास संबंधित चिमुरडी घरासमोरील मोकळ्या जागेत खेळण्यासाठी गेली होती. यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या सात भटक्या कुत्र्यांनी अचानक तिच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी चिमुरडीला घेरल्यानंतर ती जीव वाचवण्यासाठी धावू लागली. मात्र दोन कुत्र्यांनी तिच्यावर झडप घालत चावा घेतला. त्यानंतर इतर कुत्रेही तिच्यावर तुटून पडले.

चिमुरडीच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. नागरिकांनी प्रसंगावधान राखत कुत्र्यांना पळवून लावल्याने मोठी दुर्घटना टळली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.






















Join Our Whatsapp Group