आळंदी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पावन नगरी आळंदी येथे कामिका एकादशीनिमित्त इंद्रायणी नदीच्या तीरावर भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या वेळी वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने महाआरतीत सहभाग नोंदविला.

दर एकादशीला आळंदीतील इंद्रायणी नदीच्या काठावर महाआरती आयोजित करण्याची परंपरा असून, यामागे इंद्रायणी नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच तिच्या पावित्र्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला जातो. आळंदी नगरपरिषद आणि देवस्थान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येतो.

उत्तर भारतातील काशी येथे गंगा नदीला जसे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी इंद्रायणी नदीला विशेष स्थान आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सान्निध्यामुळे इंद्रायणीचे महात्म्य अधिक वृद्धिंगत झाले असून, या पवित्र नदीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने महाआरतीत सहभागी झाले.

महाआरती दरम्यान इंद्रायणीच्या तीरावर “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात भाविकांनी आरतीचा आनंद लुटला. यावेळी उपस्थितांनी इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्पही व्यक्त केला. भक्ती, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही महाआरती आळंदीकरांसह वारकरी आणि भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.






















Join Our Whatsapp Group