पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिकेट खेळाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक क्रिकेट क्लब आणि गुणवंत खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘पिंपरी-चिंचवड करंडक’ आंतर-क्लब ओपन टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 20 ऑक्टोबर 2026 पासून हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येणार आहे.

शहरातील विविध क्रिकेट क्लबचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, टी-20 क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंना आपली गुणवत्ता आणि कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी पिंपरी-चिंचवड टी-20 प्रीमियर लीग (PCPL) मध्ये खेळण्याची संधी मिळणार असल्याने क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 25 हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघाला 15 हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला 5 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा वैयक्तिक पुरस्कारांनीही खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी सांगितले की, “या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील क्रिकेट क्लब तसेच त्याच कार्यक्षेत्रातील खेळाडूंनाच सहभागी होता येणार आहे. स्थानिक खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यातील गुणवंत खेळाडूंना पुढे आणणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.”
असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात क्रिकेटचा विकास व्हावा आणि स्थानिक खेळाडूंना सातत्याने स्पर्धात्मक संधी मिळाव्यात यासाठी असोसिएशन प्रयत्नशील आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याचे प्रभावी व्यासपीठ मिळणार असून, भविष्यातील PCPL साठी गुणवंत खेळाडू निवडण्यासही मदत होणार आहे.”
स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2026 असून, इच्छुक क्रिकेट क्लबनी त्यापूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
राजू कोतवाल – 9922502414
सुशील जाधव – 9923231218


















Join Our Whatsapp Group