पिंपळे गुरव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी लोककल्याण, न्याय आणि समाजहिताचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याची उंची मोजता येणार नाही. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीने जपत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची उंची लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडमध्ये अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी-पिंपळे गुरव परिसर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव समारंभ नवी सांगवी येथील निळूभाऊ फुले नाट्यगृहात झाला.
कार्यक्रमास राज्यसभा खासदार राम वडकुते, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शंकर जगताप, माजी महापौर उषा ढोरे, शंकुतला धराडे, नगरसेवक शशिकांत कदम, ज्ञानेश्वर जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे, रविना अंगोळकर, संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, माजी अध्यक्ष अभिमन्यु गाडेकर, अजय दूधभाते, अध्यक्ष सचिन सरक,उपाध्यक्ष प्रा.शरद गलांडे, डॉ.अतुल होळकर,कार्याध्यक्ष रमेश गाढवे, सचिव रामेश्वर हराळे ,सहसचिव लक्ष्मण शिंदे,खजिनदार डॉ.दिनेश गाडेकर, सहखजिनदार सूरज गोटके,प्रसिद्धी प्रमुख महादेव मासाळ यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणादायी..
पडळकर म्हणाले, अहिल्यादेवींनी अनेक संकटांवर मात करत लोककल्याणाचे कार्य केले. होळकर घराण्याचे पुणे जिल्ह्याशी ऐतिहासिक नाते असून, सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगाव येथे भुईकोट किल्ला उभारला. काशी विश्वेश्वर मंदिरात अहिल्यादेवींचा पुतळा असणे ही अभिमानाची बाब आहे.
धनगर समाजाची लोकसंख्या मोठी असूनही राजकीय प्रतिनिधित्व अपेक्षेप्रमाणे नसणे ही शोकांतिका आहे. समाजाने आपले वेगळेपण, संस्कृती, परंपरा आणि मुळे जपली पाहिजेत. धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ला शिंग्रोबा धनगर यांचे नाव आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पडळकर म्हणाले, “स्वतःला कमी समजू नका, मोठी स्वप्ने पाहा; मात्र ती पूर्ण करण्यासाठी कृती आणि मेहनत आवश्यक आहे. यशस्वी होण्याबरोबरच चांगला माणूस होणेही गरजेचे आहे.”
मोठी लोकसंख्या असूनही प्रगतीचे चिंतन हवे
खासदार राम वडकुते म्हणाले, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सन्मान ही प्रेरणादायी बाब आहे. सुमारे दीड कोटी लोकसंख्या असताना समाजाची अपेक्षित प्रगती का झाली नाही, याचे चिंतन करण्याची गरज आहे. केवळ मोठी स्वप्ने पाहून चालणार नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी कृती करावी लागेल. अहिल्यादेवींचे विचार आत्मसात करून समाजाने पुढे जावे, असे त्यांनी सांगितले.
अहिल्यादेवी सेवा संघाचे अविरत कार्य..
गेल्या ३५ वर्षांपासून अहिल्यादेवी सेवा संघ सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहे. समाजातील तरुणांनी शिक्षण, व्यवसाय आणि कौशल्याच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच नशामुक्त आणि संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. सचिन सरक यांनी प्रास्ताविक केले.डॉ. अतुल होळकर व अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
कौतुकाची थाप आत्मविश्वास वाढवते..
यावेळी बोलताना भाजपा आमदार शंकर जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरते. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची उंची मोजता येणार नाही. मुलांना अभ्यास कसा करावा, हे सांगतानाच चांगले काय आणि वाईट काय, यातील फरक ओळखण्याची शिकवण देणेही महत्त्वाचे आहे. शिक्षणाबरोबर संस्कार आणि योग्य दिशा देण्याची जबाबदारी पालकांची आहे.
अहिल्यादेवी होळकर समितीसाठी महापालिकेची सुमारे अर्धा एकर जागा घोषित करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत ही जागा समाजाच्या विविध उपक्रमांसाठी वापरात येईल, अशी ग्वाही जगताप यांनी दिली.