पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व-२०२६ अंतर्गत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात निमंत्रित कवींचे बहारदार काव्यसंमेलन उत्साहात पार पडले. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी तथा पत्रकार पितांबर लोहार होते.

अध्यक्षीय भाषणात पितांबर लोहार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. अण्णाभाऊंच्या साहित्याने आणि शाहिरीने समाजप्रबोधनाचे कार्य करत संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिल्याचे त्यांनी नमूद केले.

या काव्यसंमेलनात सहभागी कवींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य, सामाजिक बांधिलकी आणि संघर्षमय प्रवासावर आधारित विविध कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कवी सुनील भिसे, किशोर केदारी, विशाल कसबे, अनिल दीक्षित, दीपेश सुराणा, सुहास घुमरे, दत्तू ठोकळे, महेंद्र पाटोळे, आत्माराम हारे, संजय साळुंखे, विनोद अष्टूल, विलास रुपटक्के, पुरुषोत्तम हिंगणकर, विजय कांबळे, देवेंद्र गावंडे, अशोक टाकळे, अरुण कडलक, लहू साळवे, नितीन घोलप तसेच कवयित्री फुलवती जगताप, आशा शहाणे, केसरताई लांडगे, वर्षा सोनवणे, नलिनी सोनवणे, राजेश्वरी म्हैसने आणि पिया सोनवणे यांनी आपल्या उत्कृष्ट रचनांद्वारे अण्णाभाऊंना अभिवादन केले.

कवी पितांबर लोहार यांनी सादर केलेल्या ‘अण्णाभाऊंची लेखणी’ या कवितेला विशेष दाद मिळाली. तर सुनील भिसे यांच्या ‘दीड दिवसाची शाळा’, किशोर केदारी यांच्या ‘समता’, अनिल दीक्षित यांच्या ‘अण्णाभाऊंची लेखणी’, दीपेश सुराणा यांच्या ‘लोकशाहीर अण्णाभाऊंना मानाचा मुजरा’ आणि विशाल कसबे यांच्या ‘अण्णांच्या कवितांना सलाम’ या कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी सुहास घुमरे, आत्माराम हारे, दत्तू ठोकळे, फुलवती जगताप, संजय साळुंखे, विनोद अष्टूल, देवेंद्र गावंडे, विजय कांबळे, महेंद्र पाटोळे, आशा शहाणे आदी कवींनीही समाजप्रबोधन, समता, साहित्य आणि सामाजिक न्याय यांवर आधारित प्रभावी रचना सादर केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी सुनील भिसे यांनी केले. सूत्रसंचालन कवी तथा पत्रकार किशोर केदारी यांनी तर आभार प्रदर्शन विशाल कसबे यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर आणि साहित्यिक वारशाचे स्मरण घडवून आणणारे हे काव्यसंमेलन रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.






















Join Our Whatsapp Group