पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन दुमजली इमारतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण व फीत कापून उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन, कलश पूजन व सत्यनारायण महापूजेनंतर करण्यात आली. यावेळी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी अण्णा बनसोडे यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन सत्कार केला. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी संघाच्या दैदिप्यमान कार्याचा आढावा घेत नूतन इमारतीच्या उभारणीसाठी आमदार बनसोडे यांनी दिलेल्या सक्रिय सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी माजी उपमहापौर शर्मिला बाबर, माजी नगरसेविका शैलजाताई मोरे, माजी नगरसेवक अमित गावडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, प्रितम शिंदे, बाळा दानवले, बाळा शिंदे, समीर जावळकर, अतुल इनामदार, अरुण थोरात, सरिता साने, धनंजय काळभोर, राजेंद्र बाबर, अमोल निकम, लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्पी कुमार, सचिन बनसोडे तसेच महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांच्यासह अनेक मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

इमारत बांधकाम पुनर्विकास समितीचे सदस्य सुभाष जोशी, आर. एस. कुमार, श्यामसुंदर परदेशी, सूर्यकांत मुथियान, शरद यन्नुवार, भगवान महाजन व बाळासाहेब साळुंखे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच संघाचे माजी अध्यक्ष गुणवंत चिखलीकर, भारती फरांदे, डॉ. दिगंबर इंगोले, जगन्नाथ वैद्य, डॉ. ज्योती इंगोले, दलीचंद शिंगवी, मंगेश वर्टीकर, अर्चना वर्टीकर आणि आनंद मुळूक यांचाही सन्मान करण्यात आला.

याशिवाय इमारतीचे कंत्राटदार रणजीत झेंडे, सहकारी अमोल देवकर, आर्किटेक्ट मिलिंद किर्ती, अभियंता किशोर बोटे, पत्रकार नंदू साळुंखे व प्रमोद पवार यांचाही सत्कार करण्यात आला. सुंदर रांगोळी काढणारे विश्वास फडणीस तसेच कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करणाऱ्या ज्योती कानेटकर यांचाही गौरव करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, प्राधिकरण परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेली ही पहिलीच दुमजली इमारत असून लवकरच येथे लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आपले सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संघाचे उपाध्यक्ष दिलीप गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले. संघ प्रार्थना व स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group