पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो परिसरातील भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी संबंधित कंपनीकडून मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ४० लाख रुपयांची आर्थिक मदत, तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, कुटुंबातील पात्र व्यक्तीला नोकरी आणि आरोग्य विमा देण्याची घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली.

याबाबत आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक सचिन तापकीर, नगरसेविका सारिका गायकवाड, कंपनीचे एचआर प्रतिनिधी तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

मोशी येथील कचरा डेपो परिसरात ८ जुलै रोजी कचऱ्याचा मोठा ढिगारा वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एकूण ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर १४ जण जखमी झाले होते. बचाव पथकाने तब्बल ८४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांचा शोध पूर्ण केला.

दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी विविध स्तरांवरून मागण्या करण्यात आल्या होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आणि राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

आता कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या ४० लाख रुपयांच्या मदतीसोबतच पाल्यांचे शिक्षण, कुटुंबातील पात्र व्यक्तीला रोजगार आणि आरोग्य विम्याचे संरक्षण देण्याच्या निर्णयामुळे दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना काहीसा आधार मिळणार आहे.

पत्रकार परिषदेत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबतही चर्चा करण्यात आली. आर्थिक मदतीबरोबरच मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group