पिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा देण्यासाठी गणेश मंडप परवानगी शुल्क पूर्णपणे माफ करावे तसेच मंडप उभारणीसाठी दरवर्षी परवानगी घेण्याऐवजी सलग तीन वर्षांसाठी एकत्रित परवानगी देण्याची मागणी नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर रवि लांडगे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून महाराष्ट्रासह देशभरातून भाविक आणि पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी येतात. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे अनेक वर्षांपासून हा उत्सव उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करत आहेत.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध मंडळांकडून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जातात. पूर्वी महानगरपालिकेकडून मंडळांना आर्थिक मदत दिली जात होती, मात्र सध्या मंडप परवानगीसाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

नगरसेविका रिटा सानप यांनी गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असलेला महत्त्वाचा सण असल्याचे सांगत मंडळांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मंडप परवानगी शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. तसेच दरवर्षी नव्याने कागदपत्रे सादर करून परवानगी घेण्याच्या प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांचा वेळ आणि श्रम खर्च होत असल्याने सलग तीन वर्षांसाठी एकत्रित परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सर्व सार्वजनिक गणेश मंडळे महानगरपालिकेच्या नियमांचे तसेच सुरक्षाविषयक अटींचे काटेकोर पालन करतील, अशी ग्वाही देत महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी व्यक्त केली आहे.






















Join Our Whatsapp Group