पिंपरी (Pclive7.com):- पवना नदीमध्ये खुलेआम ड्रेनेज व नाल्याचे दूषित पाणी सोडणाऱ्या खाजगी सहकारी संस्था तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.

पिंपरी चिंचवड शहराला “स्मार्ट सिटी”चा दर्जा असला तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये मूलभूत समस्या कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेत, मामुर्डी, साईनगर, विकासनगर, गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी या भागांचा समावेश होतो. मात्र रावेत गावातील काही ठराविक भाग वगळता उर्वरित भागांमध्ये स्मार्ट सिटीच्या सुविधांचा लाभ मिळत नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ऐश्वर्या तरस म्हणाल्या की, संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. रावेत बंधारा, मामुर्डी व किवळे परिसरात नदीमध्ये काही मोठ्या गृहप्रकल्पांमधून ड्रेनेज मिश्रित पाणी थेट सोडले जात आहे. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून येणाऱ्या नाल्यांमधील दूषित पाणी देखील पवना नदीत मिसळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून, याच नदीतील पाणी शुद्धीकरण करून पिंपरी चिंचवडकरांना पिण्यासाठी दिले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पवना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने तपासणी करून संबंधित संस्था व विभागांवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ऐश्वर्या तरस यांनी सभेत केली.






















Join Our Whatsapp Group