पिंपरी (Pclive7.com):- शिक्षण हक्क कायदा (RTE) प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. आरटीई अंतर्गत मुलीचा प्रवेश करून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी आपल्या मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ एप्रिल रोजी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर २७ एप्रिल रोजी अर्ज पडताळणीसाठी ते आकुर्डी येथील महापालिकेच्या फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत गेले असता, त्यांच्या मुलीचा अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात आले.

याचवेळी त्यांना ज्ञानेश्वर जगताप नावाचा एक खाजगी इसम भेटला. त्याने “मुलीचे ऍडमिशन करून पडताळणी अर्जाची रिसीट मिळवून देतो,” असे सांगत त्यासाठी तब्बल ४० हजार रुपयांची मागणी केली. संशय आल्याने तक्रारदारांनी थेट एसीबीकडे धाव घेत २९ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने ३० एप्रिल रोजी आकुर्डीतील उर्दू शाळेत सापळा रचला. शाळेच्या पहिल्या मजल्यावर ज्ञानेश्वर जगताप याने तक्रारदारांकडून ४० हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

दरम्यान, ज्ञानेश्वर जगताप हा नेमका कोणाच्या सांगण्यावरून काम करत होता? त्यामागे शाळा प्रशासन, अधिकारी किंवा इतर कोणाचे पाठबळ होते का? तसेच यापूर्वी किती पालकांकडून अशा प्रकारे पैसे उकळण्यात आले आहेत का? याचा सखोल तपास आता एसीबीकडून सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आरटीई प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.




















Join Our Whatsapp Group