पिंपरी (Pclive7.com):- मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याची भावनिक मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे.

दिपक खैरनार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उभा राहिलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प ०१ मे २०२६ रोजी कार्यान्वित होत असून, हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण मानला जात आहे. या प्रकल्पामुळे प्रवास सुमारे ०६ किमीने कमी होणार असून, तब्बल अर्धा तास वेळ वाचणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेला जगातील सर्वात रुंद बोगदा आणि भारतातील सर्वात उंच पूल ही या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत स्व. अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून निर्णायक भूमिका बजावली होती. विशेषतः २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात त्यांनी निधीची तरतूद करून प्रकल्पाला गती दिली होती. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रशासनिक क्षमतेमुळेच प्रकल्पाच्या कामांना वेग मिळाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“सामान्य जनतेचा प्रवास सुरक्षित, वेगवान आणि सुलभ व्हावा, हीच अजितदादांची भूमिका होती. ‘मिसिंग लिंक’ हा त्यांच्या कार्याचा जिवंत पुरावा आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या प्रकल्पाला त्यांचे नाव देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे खैरनार यांनी म्हटले आहे. दरम्यान, या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: ajit pawar



















Join Our Whatsapp Group