पिंपरी (Pclive7.com):- हॉटेल्सला ऑनलाइन रेटिंग देऊन आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ४१ वर्षीय व्यक्तीची तब्बल ७ लाख ९४ हजार ३९२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून ‘फाइव्ह स्टार हॉटेलला रेटिंग देण्याच्या टास्कमध्ये सहभागी झाल्यास चांगला आर्थिक फायदा मिळेल’ असे सांगितले. त्यानंतर विविध टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आर्थिक लाभाचे आमिष दाखवत आरोपींनी फिर्यादीला वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली. मात्र नंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२५ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत शिवदत्तनगर, पिंपरी गाव परिसरात घडला. फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन गुंतवणूक, टास्क पूर्ण करून पैसे कमावणे किंवा रेटिंग देण्याच्या बदल्यात मोठ्या नफ्याचे आमिष दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.




















Join Our Whatsapp Group