पिंपरी (Pclive7.com):- ऑनलाइन गुंतवणुकीवर अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल २१ लाख ४८ हजार ४९० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि फसवणुकीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण (वय २३) यांची त्यांच्या मित्रामार्फत आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी “Botbro” नावाच्या वेबसाईटद्वारे गुंतवणूक केल्यास दरमहा ७ ते ८ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या साथीदारांकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण २१ लाख ४८ हजार ४९० रुपये गुंतवण्यात आले.

सुरुवातीला आकर्षक परताव्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती मिळाली नाही. याबाबत आरोपींकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी कोणतीही रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सुयश सुनील शहापूरे (वय २४, रा. श्री साई गणेश पार्क बिजलीनगर चिंचवड), सुजीत सुनील काळे (वय २६, रा. शिवशंभो लेन, सिंबोसिस कॉलेज रोड, मुकाई चौक, किवळे) आणि खुशी तिवारी (वय २५, रा. तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच Botbro वेबसाईटचा धारक अद्याप फरार असून त्याचाही तपास सुरू आहे. निगडी पोलीस निरीक्षक घोडे पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




















Join Our Whatsapp Group