पिंपरी (Pclive7.com):- क्रीडा क्षेत्रात पहिल्याच वर्षी सहभाग घेत सेंट पीटर्स स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. टीम आणि वैयक्तिक अशा 14 हून अधिक खेळांमध्ये सहभाग नोंदवत 21 विद्यार्थिनींनी एकूण 80 प्रमाणपत्रे मिळवली आहेत. या यशामध्ये दोन विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवून विशेष कामगिरी केली. तसेच ध्रुविता चव्हाण हिने युनिफाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला.

जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांमध्ये सेंट पीटर्स स्कूलच्या मुलींनी संघ खेळांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. डॉजबॉल, शूटिंग बॉल, लंगडी आणि रस्सीखेच या खेळांमध्ये शाळेच्या संघांनी अव्वल तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवत आपली छाप पाडली. याशिवाय विद्यार्थिनींनी वुशू, कराटे, ज्युडो, बॉक्सिंग, कुराश, युनिफाईट, थाई बॉक्सिंग, बेल्ट रेसलिंग, अष्टा-दु-अखाडा आणि शस्त्रांगण मार्शल आर्ट्स या विविध वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले.

प्रमाणपत्रांच्या संख्येत श्वेता लिमन हिने 12 प्रमाणपत्रांसह आघाडी घेतली. ध्रुविता चव्हाण हिने 11, आरोही बनसोडे हिने 8, अनुष्का धेंडे, भावना कुमावत आणि रविना कुमावत यांनी प्रत्येकी 7, तनिष्का गायकवाड हिने 6, श्रुतिका अजबे हिने 4 तर द्रुती सोनवणे हिने 3 प्रमाणपत्रे मिळवली. इतर विद्यार्थिनींनीही प्रत्येकी 1 ते 2 प्रमाणपत्रे मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
या उल्लेखनीय यशामागे प्रशिक्षक प्रफुल प्रधान यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. तसेच सौ. रोधा मावस्कर आणि श्री. सुनील मावस्कर यांनी विद्यार्थिनींना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. सेंट पीटर्स स्कूलच्या विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण असून भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.




















Join Our Whatsapp Group