पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरभर उत्साहाचे वातावरण असून मनसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

वाढदिवसानिमित्त सकाळी चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात विशेष अभिषेक व प्रार्थना करण्यात आली. यावेळी राजसाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनसैनिकांनी प्रार्थना केली. त्यानंतर सकाळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भोसरी-मोशी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची मनसेची परंपरा यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली. याशिवाय, येत्या २१ जून रोजी निगडी येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शैलेश पाटील, राजू साळवे, आकाश सागरे, परमेश्वर चिल्लरगे, संतोष यादव, विक्रम भोसले, सुनील कदम, नारायण पठारे, महादेव लोखंडे, सागर बहुले, दत्ता डांगे, जितेश वाल्हेकर, चेतन कुलकर्णी, जयसिंग भाट यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विविध सामाजिक उपक्रमांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाचे आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले होते.




















Join Our Whatsapp Group