पिंपळे गुरव येथील मनपा शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न!
पिंपरी (Pclive7.com):- आजचे युग स्पर्धा, नवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) आहे. या बदलत्या काळात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात आणि ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा, डिजिटल साधने आणि विद्यार्थी-अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर आमचा मुख्य भर राहील, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे गुरव व वैदू वस्ती येथील महापालिका शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार जगताप यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिक्षण समिती सभापती रवीना अंगोळकर, माजी महापौर शकुंतला धराडे, नगरसेविका पल्लवी जगताप, नगरसेवक शाम जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, डॉ. आरती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वतःच्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत आमदार जगताप म्हणाले की, आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या या प्राथमिक शाळेत, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. शिक्षण हेच विकासाचे मुख्य साधन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वारंवार एका गोष्टीवर भर देतात की, ‘आजची युवा पिढी ही केवळ देशाची आशा नाही, तर ते उद्याचे भविष्य घडवणारे शिल्पकार आहेत.’ आपल्या देशातील ‘युवा शक्ती’ ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमी असे प्रतिपादन केले आहे की, आपल्या तरुणांमध्ये जे कौशल्य आणि ऊर्जा आहे, ती योग्य शिक्षणाने आणि संधींनीच देशाच्या प्रगतीला नवी दिशा देऊ शकते. म्हणूनच, ही शाळा म्हणजे केवळ विटांची भिंत नसून, हे उद्याचे राष्ट्र घडवण्याचे मंदिर आहे. शासन व महापालिकेच्या विविध उपक्रमांचा प्रभावी लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्राचा कायापालट झाला असून ‘गुणवत्ता’ आणि ‘कौशल्य’ या दोन गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात आपण शिक्षणासाठी सर्वोत्तम वातावरण निर्माण करत आहोत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शाळांचे डिजिटलायझेशन करणे, क्रीडा सुविधा आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळा सक्षम करणे, हे आमचे ध्येय आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते. आज डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारतातील सुमारे ६ लाख शाळा ‘स्मार्ट क्लासरूम’ आणि डिजिटल उपकरणांशी जोडल्या गेल्या असून ‘पीएम-श्री’ योजनेतून देशातील १४,५०० पेक्षा जास्त शाळांना आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज करण्यात आले आहे. ‘स्वच्छ विद्यालय अभियाना’अंतर्गत देशातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याचे उद्दिष्टही जवळजवळ पूर्ण झाले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना केवळ शाळेत पाठवू नये, तर त्यांच्यातील जिज्ञासा कायम जिवंत ठेवावी, असे अपील देखील त्यांनी केले.
“आजचे युग हे ‘एआय’ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. महापालिका शाळांतील आपले विद्यार्थी या स्पर्धेत कुठेही मागे पडू नयेत, यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण बनवणे ही आपली जबाबदारी आहे. ‘पीएम-श्री’ आणि ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून आपण शाळांचे डिजिटलायझेशन करत आहोत. कोणतीही शाळा केवळ विटांची भिंत नसून उद्याचे राष्ट्र घडवणारे मंदिर आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– आमदार शंकर जगताप
(चिंचवड विधानसभा मतदारसंघ)




















Join Our Whatsapp Group