पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती करावी तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.

स्नेहा कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या विद्यार्थ्यांकडून प्लास्टिकचे जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, कंपास पेट्या, कॅरीबॅग व इतर साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. प्लास्टिकच्या सततच्या वापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून पर्यावरण प्रदूषणाची समस्याही वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महानगरपालिका व शिक्षण मंडळामार्फत सर्व शाळांमध्ये विशेष जनजागृती अभियान, व्याख्याने, स्पर्धा व प्रबोधनपर उपक्रम आयोजित करून पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे, अशी मागणी स्नेहा कलाटे यांनी केली आहे.

तसेच पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना डीबीटी (DBT) किटद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये शक्य तेथे पर्यावरणपूरक व टिकाऊ वस्तूंचा समावेश करण्यात यावा. विशेषतः प्लास्टिकऐवजी स्टील अथवा इतर सुरक्षित व पुनर्वापर करता येणाऱ्या धातूंपासून बनविलेले जेवणाचे डबे, प्लेट, पाण्याच्या बाटल्या व कंपास पेट्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होऊन चांगल्या सवयी रुजतील, त्यांचे आरोग्य जपले जाईल तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड शहर घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group