पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीची पुनावळे येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ९१ गुंठे जागा खाजगी शैक्षणिक संस्थेला ३० वर्षांसाठी लीज तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाविरोधात आज शिवसेना पक्षाच्या वतीने महापालिका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले.

पुनावळे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेता सदर जागेवर महानगरपालिकेने स्वतःची आधुनिक व दर्जेदार शाळा उभारावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सार्वजनिक उद्देशासाठी आरक्षित असलेली जागा खाजगी संस्थेला देणे हे जनहिताच्या विरोधात असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आणि पालकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी घोषणाबाजी करत “पुनावळेची एकच हाक, लीजचा प्रस्ताव रद्द करा”, “शाळेची जागा शाळेलाच द्या” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच आगामी महासभेत सदर प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. पुनावळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शहरप्रमुख निलेश तरस, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेविका ऐश्वर्या तरस, युवासेना शहर प्रमुख पिंपरी चिंचवड चेतन बेंद्रे, युवासेना उपशहरप्रमुख चिंचवड विधानसभा सागर शिंदे, जिल्हाप्रमुख युवतीसेना मावळ लोकसभा सायली साळवी, शहर प्रमुख युवती सेना श्वेता कापसे, अश्विनी जाधव उपजिल्हाप्रमुख, समर्थ पानसे कॉलेज कक्ष प्रमुख, रोशन आवंढे कॉलेज कक्ष सरचिटणीस, विश्वजीत जाधवर कॉलेज कक्ष उपप्रमुख, ओम भोसले, सुमित चव्हाण, हृतिक जगताप, कविता कोंडे, अनिश काळभोर विधानसभा अध्यक्ष, कैलास शंकर दुर्गे. के. के. काळे, रमेश विश्वकर्मा उपशहर प्रमुख आदी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group