पिंपरी (Pclive7.com):- नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनपा हद्दीतील अनेक शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची शाळा सुरू होण्यापूर्वी नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अस्वच्छ पाण्याच्या टाक्यांमधून दूषित पाण्याचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांना गॅस्ट्रो, कावीळ तसेच पोटाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बारणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

महापालिका हद्दीतील सर्व शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची तात्काळ स्वच्छता करून त्यांचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करावे. तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाला तातडीचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“विद्यार्थ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात,” असे विश्वजीत बारणे यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group